तब्लीगबद्दलचा पुरोगामी पूर्वग्रह

कोरोना काळात महाराष्ट्रातील पुरोगामी तबलीग विरोधात द्वेष पसरविण्यात अग्रभागी होते. महाराष्ट्र टाईम्सचे समर खडस यांनी अत्यंत द्वेषमूलक लेख लिहून तबलीगचे राक्षसीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. या वर्षी रमजान महिन्यात कोकणात घडलेल्या हिंसाचाराचा दोषही तबलीगच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला गेला. पुरोगामी पत्रकार सुनील तांबे यांनी तब्लीगची तुलना थेट RSS शी करून त्यांचा मुस्लिम समाजाबद्दलचा पूर्वग्रह ठसठशीतपणे अधोरेखित केला. अनेक पुरोगामी व्यक्ती इस्लामला धोकादायक मानतात. एकंदरीत प्रतिगामी असो की पुरोगामी, इस्लामचा प्रचंड द्वेष या दोन्ही गटात आढळतो. तब्लीग प्रकरणावर कोरोना काळात लिहिलेला लेख वाचा आणि मनातले विष संपवता येते का ते थोडं तपासून पहा.

पुरागामी विश्वातील पूर्वग्रह

साजिद पठाण, औरंगाबाद.

7/19/20251 मिनिटे वाचा

a group of people sitting on the floor of a mosque
a group of people sitting on the floor of a mosque

(हा लेख कोरोना काळात प्रकाशित करण्यात आला होता.)

सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आलेला समर खडस यांचा तब्लीग जमातवरील लेख पूर्वग्रहदुषित आणि एकांगी आहे. लेखासाठी त्यांनी एकही तब्लीगी साधन हाताळण्याची तसदी घेतलेली नाही. उलट त्यांनी हाताळलेली साधने पूर्णतः biased आहेत. त्यांनी काढलेले निष्कर्ष देखील पूर्णतः चुकीचे आणि निराधार आहेत. तेव्हा त्यांच्या एकांगी, पक्षपाती आणि पूर्वग्रहदुषित लेखाचा प्रतिवाद करणे महत्वाचे आहे. तत्पूर्वी हे स्पष्ट करतो की, मी तब्लीगी नाही. तब्लीग जमातशी माझा दुरान्वये संबंध नाही. मात्र मुस्लिम समाजाचा एक भाग असल्यामुळे माझ्या समाजाची इत्यंभूत माहिती देणे, माझे कर्तव्य आहे. मागील दोन दिवसांपासून तब्लीग आणि मर्कज विषयावर रणकंदन माजविले गेले आहे. मर्कजमध्ये नेमके काय घडले आणि कशामुळे घडले, वगैरे संदर्भात मी यापूर्वी चर्चा केली आहे. या लेखात मी तब्लीग जमातबद्दल चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहे.

तब्लीग काय आहे?

तब्लीग जमात देशातील नव्हे तर जगातील सर्वात मोठी धार्मिक संघटना आहे. जवळपास १५० राष्ट्रांत तब्लीगचे कार्य चालते. देशातील प्रत्येक पाचवा मुस्लिम व्यक्ती तब्लीगी आहे. दिल्लीचे निजामुद्दीन तब्लीगचे आंतरराष्ट्रीय मुख्यालय आहे. जमातची स्थापना १९२८ च्या सुमारास मेवाड येथे झाली होती. जमातचे संस्थापक देशातील सर्वात मोठ्या आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या – दारुल उलुम देवबंद – विद्यापीठाचे विद्यार्थी होते. आज जगभरात जमातचे २५ कोटी सदस्य आहेत, त्यापैकी १५ कोटी भारतीय उपखंडात आहेत.

तब्लीगचे कार्य काय आहे?

तब्लीगची तुलना हिंदू समाजातील वारकरी संप्रदायाशी केली जाऊ शकते. तब्लीग पूर्णतः अध्यात्मवादी चळवळ आहे. धर्माच्या नावाखाली प्रचलित असणाऱ्या अनिष्ट रूढी परंपरांना तब्लीगने लोक प्रबोधनाच्या माध्यमातून आळा घातला आहे. यापैकी काही अनिष्ट रूढी परंपरांचा उल्लेख समर खडस यांनी त्यांच्या लेखात केला आहे. लेखाची सुरुवातच समर खडस त्यांच्या गावातील मुहर्रमच्या ताजियांचा उल्लेखाद्वारे करतात. भारतीय मुस्लिमांतील ही अनिष्ट परंपरा तब्लीग आणि अहले हदीस या धार्मिक संघटनांच्या प्रयत्नामुळे जवळपास संपुष्टात आली. आश्चर्य आहे, समर खडस पुरोगामी व्यक्ती असून अशा अनिष्ट परंपरेला समर्थन देत आहेत. मुस्लिम समाजातील ताजिया आणि हिंदू समाजातील अंगात येणारी देवी यामध्ये कसलाच फरक नाही. हिंदू समाजातील देवी अंगात येणे बंद होऊ शकते तर ताजिया का नाही? ताजियासारख्या अनिष्ट रूढीला मुस्लिमांचे धार्मिक संघटन विरोध करीत असेल तर ‘तोंडाचा घास’ पळविल्याचे दु:ख तर समर खडस यांना होत नाही ना?

समर खडस आपल्या लेखात बरेच घसरले आहेत. ताजियाच्या विरोधाला त्यांनी थेट अरब संस्कृतीशी जोडले आहे. मुळात ताजियाला असणारा विरोध अरब संस्कृतीच्या आधारावर नव्हे तर धार्मिक आधारवर आहे. ताजिया अनिष्ट रूढी होती, ज्यामुळे भारतीय मुस्लिम समाज एका प्रकारच्या अंधश्रद्धेच्या बेडीत अडकला होता. राहिला प्रश्न संस्कृतीचा तर समर खडस सांस्कृतिक दहशतवादाचे समर्थक तर नाहीत ना? उजव्या विचारसरणीचा सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि समर खडस संस्कृतीच्या नावाखाली करताहेत तो विरोध, यामध्ये बरेच साम्य आहे. भारत बहुसांस्कृतिक राष्ट्र असून जगातील कोणत्याही राष्ट्राची, कोणत्याही जनसमूहाची संस्कृती आपल्यासाठी त्याज्य नाही. तेव्हा ‘तथाकथीत’ अरब संस्कृतीबद्दल समर खडस यांना इतका राग का? मुळात तब्लीगची संस्कृती आणि अरब संस्कृती यांच्या दरम्यान कसलीच समानता नाही. तब्लीगी अरबांसारखा अरबी पोशाख झुब्बा नव्हे पायजमा कुर्ता परिधान करतात. अरबी भाषेचा आग्रह न धरता प्रादेशिक भाषेलाच प्राधान्य देतात. धार्मिक विचारप्रवाहात अरब धर्मपंडितांना नव्हे तर भारतीय दारुल उलुम देवबंदच्या विचारधारेला मान्यता देतात. तेव्हा समर खडसांचे सांस्कृतिक वेगळेपणाचे आधार काय, हे कळत नाही. एखाद्या अमेरिकनने हिंदू संस्कृतीने प्रभावित होऊन हिंदू धर्माचा स्वीकार केला आणि अमेरिकेत आपल्या सहकाऱ्यांना नमस्कार घालू लागला तर खडस कदाचित त्यालाही विरोध करायला उठून उभे राहतील.

सुफी परंपरेच्या विरोधाचा मुद्दा मांडताना खडस यांनी त्यांचे इस्लामबद्दलचे ज्ञान किती उथळ आहे, हे उघड केले आहे. तब्लीग जमातला सुफी परंपराविरोधी संबोधून त्यांनी आपल्या अज्ञानतेचा सज्जड पुरावा दिला आहे. भारतातील मुस्लिम धर्मपीठे मूलतः सुफी तत्वज्ञानाचा स्वीकार करणारी आहेत. देवबंदचे संस्थापक कासीम नानतोई आणि रशीद अहमद गंगोही दोन्ही नक्षबंदी सुफी होते. यामुळे सारेच देवबंदी मूलतः नक्षबंदी सुफी आहेत. तब्लीगचे संस्थापक मौलाना इलियास आणि त्यांचे अनुयायी देखील या नक्षबंदी परंपरेतील आहेत. तेव्हा तब्लीग जमातवर सुफी परंपराविरोधी असल्याचा आरोप केल्यामुळे समर खडस यांच्या तब्लीग जमात आणि सुफी परंपरेबद्दल असलेल्या अज्ञानाची प्रचीती येते.

आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ खडस एक उदाहरण देतात. खडस म्हणतात, पीराच्या कबरीसमोर काही मागणे कसे चुकीचे आहे, कबरीसमोर माथे टेकणे कसे चुकीचे आहे, तब्लीगने असे धडे द्यायला सुरुवात केली. म्हणजे खडस पीराच्या कबरीकडे मागण्याचे आणि पीराच्या कबरीला पुजण्याचे समर्थन करीत आहेत, असे दिसते. समर खडस यांचे पुरोगामित्व आमच्या आकलन शक्तीच्या पलीकडचे आहेत. समर खडस यांचे दुर्दैव आहे की, ज्या सुफी तत्वज्ञानाच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचा ते प्रयत्न करीत आहेत, ते खांदे देखील त्यांचे समर्थन करीत नाहीत. सुफी परंपरेतील नक्षबंदी आणि कादरी परंपरा पूर्वीपासून अशा प्रकारच्या अनिष्ट परंपरा आणि अंधश्रद्धांच्या विरोधी राहिल्या आहेत. आता चिश्ती परंपरेतून देखील या अनिष्ट रूढींना विरोध होण्यास आरंभ झाला आहे.

यानंतर खडस यांनी तब्लीगचे मुख्यालय पाकिस्तानात असल्याचा शोध लावला आहे. मुळात ‘संघटन’ला जमात म्हणतात हेच त्यांना माहित नसावे. मुस्लिम समाजातील समस्त संघटनांना जमात म्हणतात. उदा. तब्लीग जमात आणि जमात ए इस्लामी इ. खडस नेमके कोणत्या जमातबद्दल बोलत आहेत, हे आम्हाला माहित नाही. कारण तब्लीग जमातचे मुख्यालय तर निजामुद्दीन येथेच आहे. खडस यांचा उपरोक्त दावा म्हणजे RSS चे मुख्यालय जपानला आहे म्हणण्यासारखे आहे. अर्थातच हा दावा इतका बालिश आहे की खोडायचीही गरज नाही.

खडस यांनी त्यांच्या लेखात मंगळसूत्राचाही उल्लेख केला आहे. विषयाचे आकलन नसल्याचे कसा अर्थाचा अनर्थ होतो, याचे अप्रतिम उदाहरण खडस यांनी दिले आहे. इस्लाममध्ये मंगळसूत्र परिधान करण्याला काडीचाही विरोध नाही. विरोध त्या अंधश्रद्धेला आहे, जिचा संबंध मंगळसूत्राशी आहे. मंगळसूत्र वैवाहिक जीवनाला कुशल-मंगल ठेवते, पतीची रक्षा करते आणि पतीच्या जीवनाचे प्रतिक असते वगैरे अंधश्रद्धा इस्लामला अजिबात मान्य नाहीत. समर खडस यांना मान्य असतील तर त्यांनी आपल्या घराला बाहुली आणि गाडीला मिरचीही बांधावी. आमचा काहीच विरोध असणार नाही. परंतु मापदंड सारखेच ठेवावे. मिरची लिंबूसाठी एक मापदंड आणि मंगळसुत्रासाठी दुसरे असे करणे विवेकी माणसाचे लक्षण नाही.

समर खडस आपल्या अज्ञानतेचे इतके पुरावे देऊन थांबत नाहीत तर अज्ञानतेचा कळसही स्वतःच बांधतात. खडस यांच्यानुसार तब्लीगच्या प्रचंड आर्थिक ताकदीपुढे गरीब भारतीय मुसलमान हवालदिल झाला आहे. खडस कदाचित विसरले आहेत की, तब्लीग भारतीय मुस्लिमांची धार्मिक संघटना असून तिची स्थापना भारतातच झाली आहे. भारतीय उपखंडात तब्लीगचे जवळपास १५ कोटी सदस्य आहेत. सौदी, कतर, कुवेत आणि अरब अमिराती या अरब राष्ट्रात ‘इस्लामचे भारतीयीकरण’ केल्यामुळे तब्लीगला परवानगी नाकारण्यात आली आहे. यामुळे अरबी पैश्यांचा मुद्दा निकालात लागतो. भारतीय मुस्लिमांच्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेण्यासाठी खडस यांनी सच्चरचा अहवाल वाचला असता तर बरे झाले असते. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुस्लिमांची धार्मिक संघटना इतकी प्रचंड (जशी खडस रंगवीत आहेत) आर्थिक ताकद कशी काय उभी करू शकते? खडस यांचे उपरोक्त विधान त्यांना जमिनीवरच्या स्थितीचा काहीच अभ्यास नसल्याचे अधोरेखित करते. तब्लीग जमातचे कार्यक्षेत्र मूलतः अशिक्षित, अडाणी, अल्पशिक्षित मुस्लिमांपुरते मर्यादित आहे. उच्चशिक्षित आणि उच्चभ्रू मुस्लिमांना तब्लीग अजूनही मान्य नाही. तेव्हा समर खडस यांचे विधान किती भ्रामक आणि चुकीचे आहे, हे स्पष्ट होते.

सामान्यतः तबलीग जमातशी संबंधीत असलेले लोक आर्थिकदृष्ट्या मध्यमवर्ग, निम्नमध्यम वर्ग आणि दारिद्र्य रेषेखालच्या वर्गातून असतात. या लोकांमध्ये आर्थिक अडचणींमुळे शिक्षणाचे प्रमाण कमी असते किंवा अशिक्षित वा अडाणी असतात. शिक्षणाच्या अभावामुळे धार्मिक अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी आणि प्रथा परंपरा यांचा पगडा जास्त असतो. तसेच आर्थिक परिस्थिती गुन्हेगारीकडे घेऊन जाते. परंतु तबलीगच्या कार्याने या वर्गातील लोकांना प्रबोधनाच्या माध्यमातून अनिष्ट रुढींपासून दूर करण्यात आले आहे, प्रथा परंपरंच्या जाचातून मुक्ती देण्यात आली आहे आणि त्यांच्यातील अंधश्रद्धा नष्ट करण्यात आल्या आहेत. तबलीग जमातच्या कार्यामुळेच मुस्लिम समाजातील एक मोठा वर्ग दारु आणि जुगाराच्या व्यसनापासून दूर झाला आहे. झोपडपट्टी भागात राहणारे अनेक मुस्लिम गुन्हेगारीच्या दलदलीतून बाहेर आले आहेत. ड्रग्जच्या व्यसनात लिप्त झालेल्यांना किंवा अल्प वयात गुन्हेगारीकडे वळलेल्यांचे समुपदेशन करण्यासाठी कित्येकदा पोलीस खात्याने जमातीला लोक प्रबोधनाचे आवाहन केले आहे. अशा तबलीगचे चित्र विकृत करून मांडण्यासाठी समर खडस यांनी मोठ्या निर्दयतेने सत्याची हत्या करून चित्राला असत्याचा मुलामा चढवला आहे.

तबलीगबद्दल चर्चा करताना परिस्थितीचे गांभीर्य समजून घ्यायला हवे. देशातील प्रत्येक पाचवा मुस्लिम तबलीगी आहे. देशातील जवळपास एक पंचमांश मुस्लिम तबलीगशी संबंधित आहेत. तबलीग सर्वसामान्य मुस्लिमांची संघटना आहे. तेव्हा तबलीगवर निराधार आणि पूर्णतः खोटे आरोप लावून त्यांची प्रतिमा मालिन केल्याने हिंदू-मुस्लिम समाजात कधीच न संपणारी तेढ निर्माण होणार आहे, किंबहुना त्याचे बीजारोपण समर खडस यांच्या सारख्यांच्या लेखातून झाले आहे.