मस्जिदींवरील लाऊडस्पीकर : एक चिकित्सक दृष्टिकोन

लाऊडस्पीकरच्या वापरामुळे ध्वनिप्रदूषण, सामाजिक तणाव आणि कायदेशीर प्रश्न निर्माण होत आहेत. या लेखात अजान आणि लाऊडस्पीकरच्या वापराचा ऐतिहासिक, धार्मिक आणि सामाजिक संदर्भ तपासून, त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांचे विश्लेषण करून व्यवहार्य उपाय सुचविण्यात आले आहेत.

आधुनिक समस्या

मुजाहिद शेख

7/2/20251 मिनिटे वाचा

brown concrete tower under blue sky during daytime
brown concrete tower under blue sky during daytime

(हा लेख २०१९ साली प्रकाशित झाला होता.)

मस्जिदींवरील लाऊडस्पीकरचा वापर हा विषय धार्मिक स्वातंत्र्य, सामाजिक समरसता आणि पर्यावरणीय संतुलन यांच्यातील तणाव दर्शवणारा आहे. इस्लाममध्ये अजान ही नमाजची सामुहिक प्रार्थना सुलभ करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया आहे, तर लाऊडस्पीकरचा वापर ही आधुनिक तंत्रज्ञानाची देण आहे, जी अजानच्या आवाजाला सर्वदूर पोहोचवते. परंतु लाऊडस्पीकरच्या वापरामुळे ध्वनिप्रदूषण, सामाजिक तणाव आणि कायदेशीर प्रश्न निर्माण होत आहेत. या लेखात अजान आणि लाऊडस्पीकरच्या वापराचा ऐतिहासिक, धार्मिक आणि सामाजिक संदर्भ तपासून, त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांचे विश्लेषण करून व्यवहार्य उपाय सुचविण्यात आले आहेत.

अजानचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व

इस्लाममध्ये नमाज ही दिवसातून पाच वेळा अनिवार्य असलेली प्रार्थना आहे, आणि अजान अनिवार्य सामुहिक नमाजसाठी समाजाला एकत्र आणणारी हाक आहे. कुरआन-हदीसमध्ये अजानला विशेष स्थान आहे आणि व्यक्तिगत नमाजसाठी देखील अजान देण्यास प्रोत्साहन दिले आहे. अजान केवळ धार्मिक कृती नसून, ती सामुहिक एकतेचे आणि आध्यात्मिक जागृतीचे प्रतीक आहे. परंतु, अजानचा आवाज सर्वदूर पोहोचावा यासाठी लाऊडस्पीकरचा वापर आधुनिक काळातील आहे, ज्यामुळे धार्मिक स्वातंत्र्य आणि सामाजिक संवेदनशीलता यांच्यातील संतुलनाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

लाऊडस्पीकरचा ऐतिहासिक प्रवास

प्रारंभी जेव्हा गावे आणि वस्त्या लहान होत्या, तेव्हा मस्जिदीच्या समोरील उंच भिंतीवरून अजान दिली जायची. शहरीकरणामुळे वस्त्या विस्तारल्या आणि मिनारांचा उदय झाला. मिनारांनी अजानचा आवाज दूरवर पोहोचविण्यासह मस्जिदींची ओळख निर्माण केली. २० व्या शतकात लाऊडस्पीकरचा शोध लागला. शहरी विस्तारामुळे त्याचा मस्जिदींमध्ये स्वीकार अपरिहार्य झाला. परंतु प्रारंभी लाऊडस्पीकरला धार्मिक विद्वानांचा विरोध होता. उदा, मौलाना अश्रफ अली थानवी रहे यांनी लाऊडस्पीकरच्या वापरावर टीका केली होती. तरीही, कालांतराने लाऊडस्पीकर मस्जिदींचा अविभाज्य भाग बनला.

लाऊडस्पीकरच्या वापरामुळे उद्भवणारे प्रश्न

लाऊडस्पीकरच्या वापरामुळे अनेक सामाजिक आणि पर्यावरणीय प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यापैकी ध्वनिप्रदूषण हा प्रमुख मुद्दा आहे. संशोधनानुसार, दीर्घकालीन ध्वनिप्रदूषणामुळे तणाव, झोपेच्या समस्या आणि ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते. विशेषतः वृद्ध, दीर्घकालीन आजारी व्यक्ती आणि नवजात शिशूंना याचा त्रास होऊ शकतो. भारतातील पर्यावरण संरक्षण कायदा (१९८६) आणि ध्वनिप्रदूषण (नियंत्रण आणि नियमन) नियम (२०००) यानुसार, रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत ४५ डेसिबलपेक्षा जास्त आवाजाला बंदी आहे, परंतु अनेकदा याचे उल्लंघन होते.

लाऊडस्पीकरचा वापर केवळ अजानपुरता मर्यादित नसून, तो सर्वधर्मीयांकडून केला जातो. मात्र दोष देण्यासाठी मुस्लिम समाज टार्गेट केला जातो. म्हणून मुस्लिमांनी त्यांच्यातून हा दोष दूर करणे त्यांचे नैतिक कर्तव्य आहे. अपवादात्मक असले तरीही काही मोठ्या शहरांतून अजान व्यतिरिक्त जुमाच्या प्रवचनांसाठी देखील लाऊडस्पीकर तासंतास चालू ठेवतात. यामुळे परिसरातील रहिवाशांना त्रास होतो, विशेषतः ज्यांना शांततेची गरज आहे त्यांना. याशिवाय, लाऊडस्पीकरच्या वापरामुळे मुस्लिमद्वेषी संस्था आणि संघटनांना सामाजिक तणाव निर्माण करण्याची संधी मिळते. बहुसंख्यांकांच्या दबावापुढे प्रशासनालाही धार्मिक स्वातंत्र्य आणि सामाजिक हक्क यांच्यातील संतुलन राखणे कठीण होते.

लाऊडस्पीकरच्या वापराचे सकारात्मक पैलू

लाऊडस्पीकर वापराचे काही सकारात्मक पैलूही आहेत. शहरी वातावरणात, जेथे मिनारांवरून दिलेली अजान ऐकू येणे कठीण आहे, तेथे लाऊडस्पीकर सामुहिक नमाजासाठी प्रभावी ठरते. तसेच, अजानचा आवाज समाजाला धार्मिक व सांस्कृतिक ओळख प्रदान करतो. तरीदेखील सकारात्मक पैलूंचा सामाजिक आणि पर्यावरणीय परिणामांशी संतुलित साधणे आवश्यक आहे.

व्यवहार्य उपाय

लाऊडस्पीकरच्या वापरामुळे उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मी काही व्यवहार्य उपाय सुचवू इच्छितो. त्यापैकी तीन अत्यंत महत्वाचे आहेत आणि ते मी याठिकाणी नमूद करतो आहे.

1. लाऊडस्पीकरच्या वापरावर मर्यादा:

ध्वनिप्रदूषण नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. लाऊडस्पीकरचा आवाज ४५-५५ डेसिबलच्या मर्यादेत ठेवावा, ज्यामुळे अजानचा उद्देश साध्य होईल आणि त्रासही कमी होईल. तसेच अपवादात्मक असले तरी मोठ्या शहरांतून जुमाच्या प्रवचनांसाठी लाऊडस्पीकरचा वापर मर्यादित करावा आणि मशिदीच्या आतच प्रवचने आयोजित करावीत.

2. तंत्रज्ञानाचा वापर:

मस्जिदींसाठी लोकल मोबाइल ॲप्लिकेशन विकसित करावे, ज्याद्वारे अजानचे थेट प्रक्षेपण किंवा वेळापत्रक उपलब्ध होईल. यासाठी मस्जिदीच्या प्रवेशद्वारावर QR कोड लावता येईल. तथापि, याची अंमलबजावणी करताना डिजिटल साक्षरता आणि स्मार्टफोनच्या उपलब्धतेचा विचार करावा. मस्जिदीच्या आतच अजान देण्यासाठी आधुनिक ध्वनीयंत्रणा वापरावी, ज्यामुळे बाहेरील ध्वनिप्रदूषण टळेल.

3. सामाजिक संवाद:

मुस्लिम समाजाने परिसरातील रहिवाशांशी संवाद साधून लाऊडस्पीकरच्या वापराबाबत सामंजस्य घडवून आणावे. यामुळे सामाजिक तणाव कमी होईल. धार्मिक नेते आणि स्थानिक प्रशासन यांनी एकत्र येऊन ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करावीत.

मस्जिदींवरील लाऊडस्पीकरचा वापर हा धार्मिक स्वातंत्र्य आणि सामाजिक जबाबदारी यांच्यातील जटिल मुद्दा आहे. अजान ही इस्लाम धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे, परंतु त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लाऊडस्पीकरमुळे ध्वनिप्रदूषण व सामाजिक तणाव निर्माण होत आहे. या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी धार्मिक समाज, स्थानिक प्रशासन आणि तंत्रज्ञान यांचा समन्वय आवश्यक आहे. लाऊडस्पीकरच्या वापरावर मर्यादा, तंत्रज्ञानाचा सुजाण वापर आणि सामाजिक संवाद यांच्या माध्यमातून धार्मिक स्वातंत्र्य आणि सामाजिक समरसता यांच्यात संतुलन साधता येईल. अशा प्रयत्नांमुळे समाजातील सर्व घटकांना परस्पर आदर आणि सहकार्याची भावना वृद्धिंगत होईल.

मुजाहिद शेख