कुर्बानीवरील आक्षेपांची चिकित्सा : ‘कुर्बानीचे रूप नवे’ लेखाचे तार्किक खंडन

डॉ. हमीद दाभोलकर यांचा ‘कुर्बानीचे रूप नवे’ (लोकसत्ता, १८ जून २०२५) हा लेख ‘ईद उल अजहा’च्या कुर्बानी प्रथेची चिकित्सा करत तिला मानवकेंद्री पर्याय सुचवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्यांचा युक्तिवाद तार्किकदृष्ट्या कमकुवत, संदर्भहीन आणि धार्मिक सुसंवादाच्या आधुनिक गरजेला बाधक आहे. मी खालील लेखात, दाभोलकर यांच्या युक्तिवादाचे तार्किक आणि बौद्धिक आधारावर खंडन केले आहे, विशेषतः त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांचा आधार घेऊन.

लोकसत्तातील लेखांचा प्रतिवाद

मुजाहिद शेख

6/24/20251 मिनिटे वाचा

दाभोलकर त्यांच्या लेखात दावा करतात की, ‘अजहा’चा अर्थ ‘अर्पण करणे किंवा कुर्बान करणे’ आहे, त्यामुळे ‘ईद उल अजहा’ म्हणजे ‘कुर्बानीची ईद’. हा युक्तिवाद तार्किकदृष्ट्या चुकीचा आहे. ‘अजहा’ अरबी शब्द असून, त्याचा शब्दशः अर्थ ‘त्याग’ किंवा ‘बलिदान’ आहे, जो प्रेषित इब्राहीम [अलै.] यांच्या अल्लाहप्रती निष्ठेच्या कसोटीशी निगडित आहे. ‘कुर्बानी’ हा भारतीय उपखंडात प्रचलित उर्दू शब्द आहे, जो ‘अजहा’मागील भावनेचे प्रतीक आहे; परंतु तो ‘अजहा’च्या समानार्थी नाही. ‘कुर्बानी’ हा शब्द सामाजिक-सांस्कृतिक संदर्भात वापरला जात असला तरी तो ‘अजहा’ या धार्मिक संकल्पनेचा पर्याय होऊ शकत नाही. लेखक या दोन स्वतंत्र संज्ञांना एकच मानून संदर्भहीन युक्तिवाद करतात, ज्यामुळे त्यांची चिकित्सा इस्लामी तत्त्वांपासून विचलित होते. ‘अजहा’च्या मूळ अर्थाला बाजूला ठेवून ‘कुर्बानी’ची चिकित्सा करणे म्हणजे धार्मिक प्रथेच्या गाभ्याला न समजून घेता त्यावर आक्षेप घेणे होय.

दाभोलकर त्यांच्या युक्तिवादाच्या समर्थनार्थ ‘पर्यावरणपूरक गणपती’, ‘फटाकेमुक्त दिवाळी’ आणि ‘होळी लहान करा, पोळी दान करा’ यांसारख्या उपक्रमांची तुलना कुर्बानीच्या सुधारणेशी करतात. ही तुलना अप्रस्तुत आणि असंयुक्तिक आहे. उल्लेखित हिंदू सणांशी संबंधित समस्या (उदा., पर्यावरणाचा ऱ्हास आणि आर्थिक उधळपट्टी) या मूळ हिंदू धर्माच्या तत्त्वांशी निगडित नसून, उत्तरकाळात सामाजिक-सांस्कृतिक प्रक्षेपांमुळे निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे या सुधारणा म्हणजे हिंदू धर्मातील मूळ तत्त्वांचे पुनरुज्जीवन आहे, नवीन तत्त्वांची निर्मिती नाही. याउलट, कुर्बानी इस्लामच्या मूळ तत्त्वांपैकी आहे, जी कुरआन (सूरह सफ्फात, ३७:१००-१११) आणि हदीसमध्ये प्रेषित इब्राहीम यांच्या बलिदानाशी जोडली गेली आहे. मूळ इस्लामी तत्त्वाला आव्हान देणे आणि बाह्यप्रक्षेपांना सुधारणे यांत मूलभूत फरक आहे. लेखक या फरकाकडे दुर्लक्ष करून चुकीची तुलना करतात, ज्यामुळे त्यांचा युक्तिवाद तार्किक आधार गमावतो.

दाभोलकर कुर्बानीऐवजी ‘प्रिय वस्तूंची कुर्बानी’ (उदा., रक्तदान, आर्थिक दान) सुचवतात. मात्र, इस्लामी धर्मशास्त्रात कुर्बानीची संकल्पना स्पष्टपणे पशुबलिदानाशी जोडली आहे, जी अल्लाहच्या आदेशाचे पालन आणि त्यागाची भावना दर्शवते. ‘प्रिय वस्तूंची कुर्बानी’ ही संकल्पना इस्लामी धर्मशास्त्रात नाही. लेखकाचा हा युक्तिवाद इस्लामी तत्त्वांशी विसंगत आहे आणि त्याला कोणताही धार्मिक आधार नाही. रक्तदान किंवा आर्थिक दान हे सामाजिकदृष्ट्या कौतुकास्पद असले, तरी ते कुर्बानीच्या धार्मिक संदर्भाला पर्याय ठरू शकत नाहीत. दाभोलकर कुर्बानीच्या मूळ उद्देशाला समजून न घेता त्याला धर्मनिरपेक्ष स्वरूप देण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे त्यांची चिकित्सा असंबंधित ठरते.

दाभोलकर गेल्या शतकातील ‘कृतिशील संवादी धर्मचिकित्से’चा आधार घेतात, परंतु आजच्या काळातील सामाजिक-सांस्कृतिक वास्तवाकडे दुर्लक्ष करतात. गेल्या शतकात धर्मचिकित्सा (उदा., सती बंदी आणि अस्पृश्यता निवारण) प्रभावी ठरली, कारण त्या काळातील सामाजिक सुधारणांना धार्मिक रूढी अडथळा ठरत होत्या. जागतिकीकरणाने समाज सुधारणेचा काळ मागे टाकला आहे. आज भारतात धार्मिक तणाव, अल्पसंख्यांकांवरील हल्ले आणि सामाजिक ध्रुवीकरण यांसारख्या समस्या प्रबळ आहेत. या पार्श्वभूमीवर, धर्मचिकित्सेपेक्षा धार्मिक सुसंवाद आणि समन्वयाची गरज जास्त आहे. लेखक एका धार्मिक प्रथेवर टीका करून अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य करतात, ज्यामुळे सामाजिक एकता कमकुवत होते. आधुनिक लोकशाहीत धार्मिक समन्वय हे मूलभूत मूल्य आहे, ज्याचे दाभोलकर अवमूल्यन करीत आहेत.

दाभोलकरांचा ‘धर्मचिकित्से’चा आग्रह आधुनिक लोकशाही मूल्यांशी विसंगत आहे. लोकशाहीत धार्मिक स्वातंत्र्य आणि परस्पर आदर ही प्रमुख तत्त्वे आहेत. कुर्बानीसारख्या मूळ धार्मिक प्रथेवर टीका करणे म्हणजे मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्वातंत्र्याचा अनादर करणे होय. लेखक ‘संवादी’ चिकित्सेचा दावा करतात, परंतु त्यांचा युक्तिवाद एकतर्फी आहे, ज्यात मुस्लिम समाजाशी संवाद साधण्याचा प्रयत्न दिसत नाही. धार्मिक सुसंवादाला प्रोत्साहन देण्याऐवजी, लेखक धार्मिक तणाव वाढवतात, जे भारतासारख्या बहुधर्मी देशासाठी घातक आहे. देशाला आज विधायक कृतिशील संवादी धर्मसमन्वयाची गरज आहे, चिकित्सेची नाही. अल्पसंख्यांकांवर (विशेषतः मुस्लिमांवर) सामाजिक आणि राजकीय दबाव वाढत असताना, कुर्बानीवर टीका करणे म्हणजे मुस्लिमांच्या धर्माचरणाचे अपराधीकरण करणे होय. हे करताना लेखक कुर्बानीमुळे कोणती सामाजिक समस्या निर्माण होते, याचा कोणताही ठोस पुरावा देत नाहीत. उलट, त्यांचा युक्तिवाद मुस्लिम समाजाच्या धार्मिक उपासनांना लक्ष्य करतो, जे सामाजिक एकतेच्या दृष्टीने हानिकारक आहे.

दाभोलकरांची ‘पशुहत्येला विरोध नाही, पण कुर्बानीला विरोध आहे’ ही भूमिका धोकादायक आहे. कुर्बानी अल्लाहप्रती निष्ठा आणि त्यागाची भावना दर्शवते, जी इस्लामच्या मूळ तत्त्वांशी जोडलेली आहे. या भक्तीभावाला विरोध करणे म्हणजे मुस्लिमांची धार्मिक अभिव्यक्ती नाकारणे होय. लेखकाचा दावा की कुर्बानी ‘अल्लाहला खूश करण्यासाठी’ आहे, हा पूर्णतः चुकीचा आहे. इस्लामी तत्त्वानुसार, कुर्बानी ही अल्लाहच्या आदेशाचे पालन आणि त्यागाची भावना दर्शवते, न की अल्लाहला ‘खूश’ करणे. लेखकाला कुर्बानीच्या प्राथमिक संकल्पनेचीही माहिती नसणे, हे त्यांच्या युक्तिवादाची कमजोरी दर्शवते.

दाभोलकर सौदी अरेबियातील महिलांवरील निर्बंध आणि भोंग्यांवरील बंदीचा इस्लामी सुधारणांशी संबंध जोडतात. ही उदाहरणे असंबंधित आहेत. सौदीतील निर्बंध सामाजिक-सांस्कृतिक प्रथांवर आधारित होते, इस्लामी तत्त्वांवर नाहीत. त्याचप्रमाणे, भोंग्यांचा इस्लामशी तितकाच संबंध आहे जितका दिवाळीतील दारूगोळ्यांचा हिंदू धर्माशी. या मुद्द्यांना धर्मतत्त्वांशी जोडणे म्हणजे तारेवरची कसरत आहे, ज्यामुळे लेखकांचा युक्तिवाद संदर्भहीन ठरतो. दाभोलकर मोरोक्कोतील दुष्काळामुळे कुर्बानी न करण्याच्या आवाहनाचा उल्लेख करून गैरअर्थ काढतात. मोरोक्कोत कुर्बानी नाकारली गेली नाही; प्राण्यांच्या तुटवड्यामुळे शासकाने सामूहिक कुर्बानी केली. ही घटना इस्लामची लवचिकता दर्शवते, ज्याकडे लेखक स्पष्टपणे दुर्लक्ष करतात. ‘पाया’मध्ये कसलाच बदल न करता ‘इमला’त परिस्थितीनुसार समायोजनाला इस्लामी तत्त्वे परवानगी देतात, परंतु दाभोलकर याकडेही दुर्लक्ष करतात.

लेखक हिंदू धर्मातील चिकित्सेची परंपरा चार्वाकपासून आंबेडकरांपर्यंत असल्याचे मांडतात, परंतु हे विधान अतिशयोक्तिपूर्ण आहे. सहा निराळ्या दर्शनांना ‘हिंदू धर्म’ म्हणून मिळालेली मान्यता ही उत्तरकाळातील रचना आहे. हिंदू धर्मचिकित्सा इतकी उदात्त असती, तर भारतातून बौद्ध धम्म नष्ट झाला नसता आणि आंबेडकरांना धर्मांतर करावे लागले नसते. लेखक या ऐतिहासिक वास्तवाकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे त्यांचा युक्तिवाद एकांगी ठरतो. इस्लामी ज्ञानपरंपरेचा इतिहास याच्या उलट आहे. सातव्या शतकातील इब्न मसऊदपासून ते २१ व्या शतकातील शेख गजालीपर्यंत, इस्लाममध्ये चिकित्सकदृष्टी सातत्याने आहे. लेखक इस्लामी ज्ञानविश्वाचा अभ्यास न करता प्रचलित पूर्वग्रहांना आधार मानतात, ज्यामुळे त्यांचे लेखन बौद्धिक चर्चेला मारक ठरते.

सारांश हाच की, डॉ. दाभोलकर यांचा लेख तार्किकदृष्ट्या कमकुवत, संदर्भहीन आणि धार्मिक सुसंवादाच्या आधुनिक गरजेला बाधक आहे. कुर्बानीच्या मूळ तत्त्वांचा गैरआकलन, हिंदू सुधारणांशी असंयुक्तिक तुलना, इस्लामी ज्ञानपरंपरेचा अपमान आणि धर्मचिकित्सेचा कालबाह्य आग्रह यामुळे लेख तार्किकता गमावतो. भारतासारख्या बहुधर्मी देशात धार्मिक समन्वय आणि सुसंवाद काळाची गरज आहे, ज्याला लेखक बाधा आणतात. कुर्बानीसारख्या प्रथांचा आदर करत त्यांचा सामाजिक संदर्भ समजून घेणे, हेच सुधारणावादाचे खरे स्वरूप आहे.

मुजाहिद शेख